देश-विदेश

ब्रिटीश महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला 11 दिवसांचा रिमांड

टिम Newslive मराठी: मडगाव – पाळोळे-काणकोण येथे ४८ वर्षीय ब्रिटीश महिलेवर बलात्कार करण्याचा आरोप असलेल्या रामचंद्रन वय (३०) या मूळ तमिळनाडू येथील संशयिताला आज काणकोण न्यायालयात रिमांडासाठी हजर केले असता ११ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

ज्या ठिकाणी ही बलात्काराची घटना घडली त्या ठिकाणी असलेल्या एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयिताची छबी टिपली गेल्यामुळे मडगाव रेल्वे स्थानकावर त्याला अटक करण्यात आली. ही घटना गुरुवारी पहाटे ४ च्या सुमारास काणकोण येथे घडली होती. दोन तासातच म्हणजे सकाळी 6 वाजता त्याला मडगाव रेल्वे स्थानक परिसरात अटक करण्यात आली.

दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळेच संशयिताला दोन तासात पकडण्यात यश आले. ज्या दुकानातील कॅमेऱ्यात संशयिताची छबी टिपली गेली त्या दुकानाचे मालक भाई देसाई याचा पोलिसांतर्फे गौरव करण्यासाठी शिफारस केली जाईल असे  काणकोणचे पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.