महाराष्ट्रराजकारण

राज्य सरकारमधील तब्बल ११ आमदार नाराज? ठाकरे सरकार धोक्यात येण्याची शक्यता

राज्यात भाजपची साथ सोडून शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. मात्र ठाकरे सरकारमधील नाराजी नाट्य काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. आमच्या सरकारमध्ये सर्वकाही अलबेल आहे, असे सत्ताधारी पक्षातील नेते सांगतात. मात्र ठाकरे सरकारमध्ये संवाद नाही, सरकारमध्ये समन्वय नाही, अशी टीका विरोधक करत आहे. याचप्रमाणे विरोधक महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे तब्बल 11 आमदार ठाकरे सरकारवर नाराज असल्याचा दावा काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर एक नवं विघ्न आले आहे. “निवडणुकीत ज्यांना पराभूत केले, त्या विरोधकांना निधी मिळतोय,’ असे म्हणत नाव न घेता गोरंट्याल यांनी शिवसेनेवर शाब्दिक निशाणा हाणला.

तसेच ‘नगर विकास खात्याकडे वारंवार निधीसाठी मागणी करूनही निधी दिला जात नाही. मी आमदार असून मला 1 रुपयाही निधी दिला गेला नाही,’ असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, आपल्यासोबत 11 आमदार नाराज आहेत, असे म्हणत गोरंट्याल यांनी थेट उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा जोर धरू लागल्या आहेत.