बातमीमहाराष्ट्र

मुंबईत पाच ऑगस्टपासून 20 टक्के पाणीकपात

Newslive मराठी-  धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेली  पावसाची  येजा , मागील वर्षांच्या तुलनेत पाणीसाठय़ात निर्माण झालेली प्रचंड तूट यामुळे जलाशयांमध्ये 34 टक्के म्हणजे साधारण 133 दिवसांची गरज पूर्ण करेल एवढेच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने बुधवार, 5 ऑगस्टपासून 20 टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील साठ्याचा आढावा घेऊन पालिकेच्या जलविभागाने 5 ऑगस्टपासून मुंबईत 20 टक्के पाणीकपात करण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना सादर केला होता. त्याला आयुक्तांनी मंजुरी दिली.

मुंबई महापालिकेमार्फत ठाणे आणि भिवंडी परिसरांतील काही गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. तेथील पाणीपुरवठ्यातही 20 टक्के कपात करण्यात येणार आहे. तुळशी जलाशय 28 जुलै रोजी ओसंडून वाहू लागला. मात्र उर्वरित सहा जलाशयांच्या क्षेत्रांत जूनपासूनच पावसाचा लपंडाव सुरू आहे.

जलाशयांमध्ये 31 जुलैला चार लाख 99 हजार 199 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा (34 टक्के) आहे. मुंबईकरांना साधारण 133 दिवस पुरेल इतकेच पाणी आता जलाशयांमध्ये आहे. गेल्या वर्षी 31 जुलै 2019 रोजी 12 लाख 40 हजार 122 दशलक्ष लिटर (85.68 टक्के), तर 31 जुलै 2018 रोजी 12 लाख 05 हजार 596 दशलक्ष लिटर (83.30 टक्के) पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जलाशयांमध्ये सात लाख 50 हजार 9230 दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची तूट आहे.

महत्वाच्या बातम्या-

-दूध उत्पादकांसाठीचे भाजपचे आजचे आंदोलन हे पुतणा मावशीचे प्रेम आहे- राजू शेट्टी

-आपल्याकडे लॉकडाऊन, अनलॉकचा ताळमेळच नाही- राज ठाकरे

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi