बातमीलक्षवेधी

अभ्यासावरुन वडील रागवल्यामुळे 20 वर्षीय तरुणाची आत्महत्या

Newslive मराठी- पंजाबमधील जालंधर शहरात 20 वर्षीय तरुणाने वडील अभ्यासावरुन रागवत असल्यामुळे आत्महत्या केली आहे. माणिक शर्मा असं या मुलाचं नाव असून त्याचे वडील चंद्रशेखर शर्मा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असून जालंधर शहरात मेडिकलचं दुकान चालवतात. 20 वर्षीय माणिक स्थानिक कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षाला BBA शाखेचा विद्यार्थी होता. गेल्या काही दिवसांपासून माणिक सतत मोबाईलवर वेळ घालवायचा. त्याला PUBG खेळण्याचा नाद लागला होता.

परीक्षेत मार्क कमी आल्यामुळे चंद्रशेखर शर्मा आपल्या मुलाला सतत ओरडत, मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा अभ्यासात लक्ष द्यायला सांगायचे. गुरुवारी सकाळी चंद्रशेखर शर्मा आणि त्यांचा मुलगा माणिक यांच्यात पुन्हा एकदा अभ्यासावरुन वाद झाला. यानंतर चंद्रशेखर आपल्या दुकानात रोजच्या कामासाठी निघून गेले. यानंतर माणिकने आपल्या वडिलांच्या लायसन्स रिव्हॉल्वरमधून आपल्या छातीत गोळी झाडत आत्महत्या केली.

आपल्या मृत्यूपुर्वी माणिकने एका ओळीची सुसाईड नोट लिहून ठेवली होती, ज्यात मी खुप वाईट आहे असं लिहीलं होतं. पोलिसांनी याप्रकरणात आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून आपला मुलगा सतत मोबाईलवर वेळ घालवत होता. त्याचं अभ्यासावरचं लक्ष उडाल्यामुळे मी देखील त्याला अनेकदा ओरडायचो. त्याचे परीक्षेतले मार्कही कमी झाले होते. एकदा रागाच्या भरात त्याने आपला मोबाईल आपटून फोडला होता, अशी माहिती चंद्रशेखर यांनी दिली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi