महाराष्ट्रराजकारण

नाशिक-पुणे महामार्गावर तब्बल 2700 झाडांची कत्तल!

सध्या वृक्षतोड हे सर्वात मोठे संकट आपल्याकडे आहे. अनके प्रकारची झाडे तोडली जात आहेत. यातच आता महामार्ग चौपदरीकरण करताना नाशिक-पुणे महामार्गावरील जवळपास 2700 हुन अधिक वृक्ष तोडले गेले असल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे. प्रत्येक झाडामागे 10 वृक्ष लावण्याची अट टाकण्यात आली होती. मात्र, ठेकेदाराने या अटींचे पालन न करता दिशाभूल केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी केला आहे.

गणेश बोऱ्हाडे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली असून याबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता राष्ट्रीय हरित लवादाने वनविभागासह सार्वजनिक बांधकाम विभागाला नोटिसा बजावल्या आहेत.

रस्ता बनवताना शेकडो वर्षापूर्वीच्या हजारो झाडांचा बळी गेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात कऱ्हे घाट ते बोटा खिंड या 44 किमी अंतरात विविध प्रकारची 2373 झाडे तोडण्यात आली होती. त्या प्रत्येक झाडामागे 10 झाडे लावण्याची अट ठेकेदाराला घालण्यात आली होती. मात्र, रस्त्याच्या मध्यभागी 7480 एवढी केवळ झुडूपे लावण्यात आली आहे. तर दुतर्फा 36,600 एवढी झाडे लावल्याचे सांगण्यात आलेलं असताना आज एकही झाड अस्तित्वात दिसत नाही. यामुळे या ठेकेदारावर कारवाईची मागणी केली जात आहे.