महाराष्ट्रराजकारण

पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे 65 लाख मुख्यमंत्री निधीस जमा

सध्या कोरोनामुळे अर्थव्यवस्था ठप्प आहे. निधी मोठ्या प्रमाणावर कमी पडत आहे. अशातच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा एक दिवसाच्या वेतनाचा 65 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. मंडळाच्या सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीनेही पाच लाख रुपये देण्यात आले.

कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सामाजिक बांधीलकीतून संस्थेतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या या मदतीचे उपमुख्यमंत्री पवार यांनी कौतुक केले आहे. ही संस्था पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेली 79 वर्षांपासून ज्ञानदानाचे कार्य करीत आहे.

सुमारे साडेतीन लाख विद्यार्थी संस्थेच्या विविध शाखांमधून विविध प्रकारचे शिक्षण घेतात. संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा हातात घेतल्यानंतर अजित पवार यांनी ग्रामीण भागातील शाळा इमारतींचा कायापालट केला आहे. अध्यापनाबरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातही विधायक उपक्रम राबविले. अशाच प्रकारची मदत इतर संस्थानी देखील केली पाहिजे.