कोरोनादेश-विदेश

देशात मागील २४ तासांत आढळले ६६,९९९ रुग्ण; ९४२ जणांचा मृत्यू

Newsliveमराठी – जगात करोनाचं थैमान अजूनही थांबलेलं नाही. मागील काही दिवसांपासून देशात दररोज 60 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रुग्णसंख्या दिवसाला आढळून येत आहे. तर दुसरीकडे सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनानंतरही करोनाबळींचा आकडाही वाढत चालला आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ६६ हजार ९९९ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे तर ९४२ जणांचा मृत्यू झाला आहे.

दिवसागणिक देशात करोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २३ लाख ९६ हजार ६३८ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. सध्या देशात सहा लाख ५३ हजार ४२२ जणांवर उपचार सुरु आहेत. याच्या दुपटीपेक्षा जास्त रुग्णांनी करोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत १६ लाख ९५ हजार ९८२ जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे.