महाराष्ट्र राजकारण

बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे- खासदार जया बच्चन

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडवर घराणेशाहीचा आरोप झाला. त्यानंतर अभिनेत्री कंगना राणौत हिनं बॉलिवूड माफिया आणि ड्रग्स कनेक्शन हा मुद्दा ऐरणीवर आणला. अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह आतापर्यंत १० पेक्षा अधिक जणांना एनसीबीने ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे. त्यामुळे बॉलिवूड आणि ड्रग्स यांचं कनेक्शन आता उघड होऊ लागलं आहे.

मात्र बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे असा आरोप खासदार जया बच्चन यांनी केला. याबाबत राज्यसभेत जया बच्चन म्हणाल्या की, बॉलिवूडला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. मनोरंजन क्षेत्र दिवसाला ५ लाख लोकांना रोजगार देते. देशाची आर्थिक स्थिती बिकट आहे आणि अन्य गोष्टींपासून लक्ष हटवण्यासाठी बॉलिवूडचा वापर केला जात आहे. सोशल मीडियात बॉलिवूडला निशाणा बनवला जात आहे. आम्हाला सरकारकडून समर्थन मिळत नाही. ज्या लोकांना या फिल्म इंडस्ट्रीजने नाव दिलं आज तेच बॉलिवूडला गटार संबोधत आहेत मी याचं समर्थन करणार नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच या उद्योगात असे काही लोक आहेत जे सर्वाधिक कर भरतात. पण त्यांना त्रासही दिला जात आहे. चित्रपटसृष्टीसाठी अनेक आश्वासने दिली गेली परंतु ती कधीच पूर्ण झाली नाहीत. सरकारने मनोरंजन क्षेत्राच्या समर्थनात यावे. ही इंडस्टी नेहमी सरकारला मदत करण्यासाठी पुढे आली आहे. सरकारची कोणतीही चांगली कामे असतील त्याचे आम्ही समर्थन करतो. जेव्हा आपत्ती येते तेव्हा फक्त बॉलिवूडचे लोक पैसे देतात असं जया बच्चन म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *