खेळ

इशांत शर्मासह एकूण २९ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

Newsliveमराठी – भारतीय कसोटी संघाचा प्रमुख गोलंदाज इशांत शर्मासह २९ खेळाडूंची यंदाच्या अर्जुन पुरस्कारांसाठी शिफारस करण्यात आलेली आहे. क्रीडा मंत्रालयाच्या समितीने मंगळवारी झालेल्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब केलं आहे. इशांतसह या यादीत तिरंदाज अतानु दास, महिला हॉकीपटू दिपीका ठाकूर, कबड्डीपटू दिपक हुडा, टेनिसपटू दिवीज शरण या खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात आल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.

३१ वर्षीय इशांत शर्माने भारताकडून आतापर्यंत ९७ कसोटी आणि ८० वन-डे सामने खेळले आहेत. इशांतच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० पेक्षा जास्त बळी जमा आहेत. या खेळाडूंव्यतिरीक्त महिला कुस्तीपटू साक्षी मलिक आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांच्या नावावरही बैठकीत चर्चा झाली. पण निवड समितीने या दोन्ही खेळाडूंबद्दलचा अंतिम निर्णय क्रीडामंत्री किरेज रिजीजू यांच्यावर सोपवला आहे.