खेळमहाराष्ट्र

धोनीच्या निवृत्तीनंतर पंतप्रधान मोदीही भावुक; पत्र लिहून म्हणाले..

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने शनिवारी 15 ऑगस्टला सायंकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. भारताला क्रिकेटच्या शिखरावर नेणाऱ्या धोनीला अनेक दिग्गज खेळाडू, नेते, अभिनेते यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही धोनीला पत्र लिहून त्याचे कौतुक केले आहे. धोनीने पंतप्रधान मोदी यांचे पत्र ट्विट करून त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला आणि आभार मानले.

एक कलाकार, जवान आणि खेळाडू यांना नेहमीच कौतुकाची अपेक्षा असते. त्यांच्या मेहनतीचे आणि बलिदानाचे महत्व सर्वांनी ओळखावे असे वाटते, असे ट्विट करता धोनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कौतुकाबाबत आणि दिलेल्या शुभेच्छाबाबत आभार व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धोनीच्या निवृत्तीचा क्षण भावुक असल्याचे म्हटले. तसेच कारकिर्दीतील अनेक मोलाचा क्षणांचा उल्लेख देखील मोदींनी आपल्या पत्रात केला. धोनीमध्ये भारताचा आत्मा झळकतो, जिथे तरुण आपल्या स्वतःच्या बळावर यश आणि नाव कमावतात, असे मोदी म्हणाले.

भारतीय क्रिकेट संघाला शिखरावर पोहोचवण्यात तुझे मोठे योगदान आहे. क्रिकेट इतिहासात तुझे नाव निःसंशय सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम कर्णधार आणि सर्वोत्तम यष्टीरक्षक म्हणून घेतले जाईल, असेही मोदींनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.