बारामतीमहाराष्ट्र

राज ठाकरेंनंतर सुप्रिया सुळेंची राज्य सरकारकडे महत्त्वाची मागणी

कोरोनाने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. लॉकडाउनची घोषणा होण्याच्या आधीपासूनच राज्यातील जीम, व्यायामशाळा बंद करण्याचे आदेश सरकारने दिले होते. अनलॉक – 2 सुरू झाल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जीम सुरू कराव्यात अशी मागणी केली होती.

आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही राज्य सरकारने जीम सुरू करण्याबद्दल मागणी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करून राज्य सरकारला एका जीम चालकाचे पत्र पाठवले आहे.’ कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर राज्यातील जीम बंद करण्यात आल्या आहेत. परंतु, आता अनलॉकची प्रक्रिया सुरू असल्याने जीम पुन्हा सुरु करणे आवश्यक आहे.

राज्यातील अनेक जीम चालकांनी यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे’ असं स्पष्ट मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं आहे. या पत्रात जीम मालकाने आपल्या अडचणीचा पाढाच वाचला आहे. मार्च महिन्यांपासून जीम बंद आहे. आम्ही जेवढी बचत केली होती. ती आतापर्यंत वापरली. आता बँकेचे हफ्ते, वीज बिल, जागेचे भाडे देणे अशक्य झाले आहे. जीम बंद असली तरी भाडे आणि विज बिल भरावेच लागत आहे. आमच्यावर आता भीक मागण्याची वेळ आली आहे, अशी व्यथा जीम मालकांने मांडली आहे.

जीम चालकांनी काही दिवसांपूर्वी कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती. यावेळी, जर राज्यातील दारूचे दुकाने, मॉल उघडली जात असेल तर जीम उघडण्यास अडचण काय आहे. तुम्ही जीम उघडा, ज्यांना यायचे ते येतील, बाकी पाहून घेऊ, असे आश्वासन राज ठाकरेंनी दिले होते.