महाराष्ट्रराजकारण

सारथीच्या योजनांचा अधिकार आता अजित पवारांकडे

सारथीसह मराठा समाजाशी संबंधित योजनांचा कारभार अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आला आहे. राज्य सरकारने आज जीआर जारी करून सारथी संस्थेसह मराठा समाजाच्या योजना राबवण्याची जबाबदारी अजित पवार यांच्याकडील नियोजन विभागाकडे वर्ग केली आहे.

सारथी संस्था आणि मराठा समाजाशी संबंधित योजनांची जबाबदारी काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या बहुजन कल्याण विभागाकडे होती. मात्र, ओबीसी समाजाचे असलेले विजय वडेट्टीवार मराठा समाजाला न्याय देत नसल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांनी व्यथित झालेल्या मंत्री वडेट्टीवार यांनी सारथीची जबाबदारी अजित पवारांनी स्वीकारावी अशी त्यांना विनंती केली होती.

अजित पवारांनीही सारथी संस्थेची जबाबदारी त्यांच्या अखत्यारितील नियोजन विभागाकडे घेण्याचे जाहीर केले होते. मात्र, काँग्रेसचा सुरुवातीला याला विरोध होता. अखेर आज यासंदर्भात जीआर जारी करून सारथी संस्थेसह मराठा समाजाच्या इतर योजनांची जबाबदारीही अजित पवार यांच्याकडील नियोजन विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे.