आरोग्यमहाराष्ट्र

पुण्यात ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात अजित पवारांची बैठक

पुण्यातील विधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थितीबाबत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. पुणे आणि पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

जम्बो हॉस्पिटलबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढवण्यासाठी इथली परिस्थिती आणि व्यवस्थापन सुरळीत असणं आवश्यक आहे. जम्बो हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे सांगून इथल्या बेडच्या उपलब्धतेची माहिती पोहोचवण्यात व उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे स्‍पष्‍ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रातून पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी कोरोना बाधित रुग्ण दाखल होत आहेत. कोरोनाच्या रुग्णांना वेळेत व योग्य ते वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणेने पूर्ण ताकदीनिशी काम करावे. कोरोना परिस्थती नियंत्रणासाठी राज्य शासन सर्व प्रकारे मदत करत असून दोन्ही महापालिकेच्या आरोग्य विभागाने देखील सक्रियपणे काम करावे. पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये देखील ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी विभागीय आयुक्तांनी नियोजनबध्द कार्यवाही करावी