आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्र

अमेरिकी तज्ज्ञाचे मत; कोरोनापासून वाचण्यास लसीपेक्षा मास्क उपयुक्त

अमेरिकेत कोरोनाची प्रतिबंधक लस या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या प्रारंभी सर्वांसाठी उपलब्ध होईल असे म्हटले जात असले तरी ती साथ निर्मूलनासाठी किती उपयोगी ठरेल, हे आताच कोणालाही सांगता येणार नाही. जलदगती प्रयोगातून तयार केलेली लस फारशी प्रभावी ठरणार नाही असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे.

दरम्यान, अमेरिकी सिनेटच्या उपसमितीच्या बैठकीत कोरोनासंदर्भात सिनेट सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. रॉबर्ट रेडफील्ड यांनी सांगितले की, तोंडाला लावायचे मास्क हे कोरोनापासून रक्षण करण्यासाठी लसीपेक्षाही अधिक उपयोगी ठरतील, असे आम्ही केलेल्या पाहणीतून आढळले आहे.

त्या पार्श्वभूमीवर रॉबर्ट रेडफील्ड यांनी सांगितले की, कोरोना संसर्गावर लस उपलब्ध झाली तरी त्यानंतरही लोकांनी मास्क घातले पाहिजेत. त्यामुळे या साथीवर खूप लवकर नियंत्रण मिळविता येईल. लस बनविण्याचे प्रयोग यशस्वी झाले तरी पुढील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या अखेरीस किंवा तिसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीपर्यंत ही लस सर्वांना उपलब्ध करून देता येईल. त्याच्या आधी हे काम होणे शक्य नाही.

कोरोना प्रतिबंधक लस येत्या नोव्हेंबर महिन्याच्या आधीच अमेरिकी जनतेला उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्या देशाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार सांगत आहेत. नोव्हेंबरमध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक असल्याने लसीबाबत ट्रम्प यांनी खोटा प्रचार चालविला असल्याचा आरोप डेमोक्रॅटिक पक्षाने केला आहे. अमेरिकेमध्ये सध्या काही लसींच्या मानवी चाचण्या सुरू आहेत.