महाराष्ट्रराजकारण

शेतकर्‍यांसाठी 5 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करा, भाजपची मागणी

सध्या कोरोना काळात शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची गरज आहे. अन्य राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना 5000 कोटींची मदत जाहीर करा. छोटे व्यावसायिक, असंघटित कामगार, रिक्षा टॅक्सिचालकांसह गटई कामगारांना मदत द्या. वीजबिलात 50 टक्के सवलत द्या आणि आर्थिक स्थितीबाबत श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत केली.

दरेकर यांनी कोरोना, महापूर, निसर्ग वादळ, शेतीचे नुकसान आणि सरकारची असंवेदनशीलता या मुद्द्यांवरून राज्य सरकारला जोरदार झोडपून काढले. महाविकास आघाडी प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरली आहे, अशी टीका त्यांनी केली.

कोरोना यंत्रणेत मंत्रिमंडळात, विविध खात्यात, प्रशासनात समन्वय नव्हता, असा आरोप करताना त्यांनी विविध रुग्णालयात रुग्णांची झालेली लूट, असुविधा, यंत्रणेतील त्रुटी याची आकडेवारीसह कमतरता स्पष्ट केली. मृत्युमुखी पडलेल्या कोरोना योद्ध्यांना शहिदांचा दर्जा द्यावा. त्या दर्जानुसार सवलती द्याव्यात. कोरोना उपाय योजनांसाठी अतिरिक्त निधी द्या, अशा मागण्या दरेकर यांनी केल्या. सध्या कोरोनामुळे सरकारकडे देखील आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. यामुळे आता सरकार काय पॅकेज जाहीर करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.