महाराष्ट्रराजकारण

केंद्र सरकारमधील आणखी एक केंद्रीय मंत्री कोरोना पॉजिटीव्ह!

देशात कोरोनाची अनेक राजकीय नेत्यांना लागण झाली आहे यामध्ये काहींचा मृत्यू देखील झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 28 लाखांपेक्षा अधिक वाढला आहे. कोरोनाच्या विळख्यात अनेक व्हीआयपी लोक देखील अडकले आहेत. मोदी सरकारच्या अजून एका मंत्र्यांचा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आला आहे.

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. राजस्थानच्या जोधपूरचे प्रतिनिधीत्व करत असून मोदी सरकारमधील ते चौथे कोरोनाबाधित मंत्री आहे. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, धर्मेंद्र प्रधान व अर्जनराम मेघावाल हे बाधित झाले आहे. जोधपूर भाजपचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र जोशी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शेखावत यांची तपासणी करण्यात आली.

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ‘प्रकृती अस्वास्थ्यामुळे व काही लक्षणे दिसल्याने मी कोरोना चाचणी केली आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहे.

गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी आयसोलेट व्हावे आणि चाचणी करून घ्यावी’, असे आवाहन गजेंद्र सिंह शेखावत यांनी केले आहे. सतलज, यमुना नद्या जोडणीसंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची मंगळवारी भेट घेतली होती. आता त्यांनी देखील स्वतःला आयसोलेट केलं आहे. यामुळे कोरोनाच्या यादीत अजून एका मंत्र्याचे नाव आले आहे.