महाराष्ट्रराजकारण

१०५ आमदार असलेल्यांना माझी ताकद विचारा- संजय राऊत

सध्या कंगना रणावत आणि संजय राऊत यांच्यात जोरदार वाद सुरू आहे. आता राऊत यांनी टीकाकारांना खास शैलीमध्ये उत्तर दिले आहे. राऊत यांनी विरोधकांना विधानसभा निवडणुकांनंतर झालेली राजकीय उलथापालथ लक्षात आणून दिली.

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनाला संजय राऊत यांनी चांगलेच सुनावले आहे. यावरून राज्यात जोरदार राजकारण पेटले आहे. फेसबुक खात्यावर लिहिलेल्या एका संदेशामध्ये राऊत म्हणाले, ‘माझी ताकद काय आहे, हे त्या लोकांना विचारा, ज्यांच्याकडे १०५ आमदार असूनही विरोधकांच्या बाकांवर बसण्याची वेळ आली, ‘जय महाराष्ट्र’.

राऊत यांच्या या विधानाचा थेट संबंध महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतरच्या राजकीय घडामोडींशी आहे. त्यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजप १०५ आमदारांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष असताना देखील शिवसेनेने वेगळी वाट धरली. यामुळे भाजपवर विरोधकांची भूमिका सांभाळण्याची वेळ आली. या सर्व घडामोडीत संजय राऊत यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती.