महाराष्ट्रराजकारण

जनजागृती झाली आता कोरोनाची कॉलरट्यून बंद करा- मनसे

देशात २५ मार्चपासून कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. तेव्हापासून कुणालाही फोन केल्यानंतर कोरोनाबाबत जनजागृती करणारी कॉलर ट्यून सरकारने चालू केली आहे. आता पाच महिने झाल्यानंतर लोकांमध्ये बऱ्यापैकी जागृती निर्माण झाली आहे. तसेच अनलॉकची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे, त्यामुळे गरज नसताना घराबाहेर पडू नये, सांगण्यात देखील अर्थ नाही.

हे प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केले आहेत. नांदगावकर यांनी ट्विटरवर ट्विट करत आपली भूमिका मांडली तसेच ही कॉलर ट्यून बंद करा, अशी मागणी त्यांनी केली. नांदगावकर म्हणाले की, कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाने गेली अनेक महिने कॉलर ट्यून म्हणून कोरोना ची माहिती देण्यात येत आहे.

परंतु आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे व या कॉलर ट्यूनमुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असले तरी विलंब होतो अथवा लागत नाही, त्यामुळे जी काही जनजागृती करायची ती विविध माध्यमातून जाहिरातीद्वारे होतच आहे. त्यामुळे आता ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी.

मार्च महिन्यात फोन लावल्यानंतर खोकल्याचा आवाज यायचा आणि त्यानंतर कॉलर ट्यून सुरु व्हायची. त्यामुळे अनेकांचा गैरसमज होत होता. यातून टीका झाल्यानंतर ती कॉलर ट्यून मागे घेण्यात आली होती. त्यानंतर आपल्याला रोगाशी लढायचंय, रोग्याशी नाही, ही कॉलर ट्यून ऐकायला मिळू लागली आहे. त्यामुळे आता ती बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.