बारामतीमहाराष्ट्र

बारामती सोमवारपासून 14 दिवस पूर्णपणे लॉकडाऊन

कोरोनाचे रुग्ण देशात वाढतच आहेत. आता ग्रामीण भागात देखील कोरोना वाढत आहे. आता वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी बारामती शहर व तालुक्यात सोमवारपासून जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे व पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर यांनी आज केले. गेल्या तीन दिवसात जवळपास 300 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर आज प्रशासन व पदाधिकारी यांच्या तातडीच्या बैठकीत अनेक उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यात आला.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी आवश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितल्यानंतर आज जनता कर्फ्यूचे आवाहन करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यापाऱ्यांनी मात्र या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

बारामती तालुक्यातील काही गावे कोरोनाबाधित नसली तरीही या गावांनीही जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होऊन सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहर व तालुक्यातील जनतेला हे आवाहन असल्याचे त्यांनी नमूद केले. बारामती तालुक्याची व शहरातून नागरिकांनी बाहेर जाऊ नये व बाहेरच्या नातेवाईक किंवा इतरांना बारामतीत या काळात बोलावू नये, चौदा दिवस पुरेल इतका किराणा, भाजीपाला व आवश्यक वस्तूंचा साठा करुन ठेवावा, असे सुचविण्यात आले आहे.