कृषीमहाराष्ट्र

नागपुरातील मोसंबी बागांवर फळगळतीचे मोठे संकट!

शेतकऱ्यांवर अनेक प्रकारची संकटे येत आहेत. कधी अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ पडत असतो. आता नागपूर विभागातील मोसंबी उत्पादक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नरखेड मध्ये अज्ञात रोगामुळे मोसंबी फळाची मोठ्या प्रमाणावर गळती झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठं नुकसान झाला असून आधीच कोरोना मुळे फळांना भाव नसल्याने संकटात असलेले शेतकरी आणखी हवालदिल झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून फळ गळती वाढली असून राहिलेल्या फळांना डाग आल्याने शेतकरी निराश झाले आहे. संपूर्ण देशामध्ये नागपूर जिल्हा संत्रा व मोसंबी या पिकासाठी प्रसिद्ध आहे. नागपूर जिल्ह्यात नरखेड तालुक्यामध्ये दोन्ही पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

नरखेड तालुक्यातील बहुतांश शेतकरी तर याच दोन पिकावर अवलंबित आहे. यावर्षी पाऊस समाधानकारक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मोसंबीचे उत्पादन होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र कोरोनामुळे बाजार पेठ अनेक दिवस बंद असल्याने आधीच नुकसान सहन करत असलेले शेतकरी आता नव्या अज्ञात रोगामुळे त्रस्त झाले आहे. यामुळे अगोदरच कोरोना काळात अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांवर आता अजून एक मोठे संकट आले आहे.