महाराष्ट्रराजकारण

भाजपचे घंटानाद आंदोलन हे फक्त राजकारण- राजेश टोपे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले लॉकडाऊन आता शिथिल करण्यात येत आहे. मात्र मंदिर उघडण्याबाबत राज्य सरकारची अजूनही चर्चा सुरू आहे. आता राज्यात मंदिरे उघडण्याची मागणी करत भाजपकडून घंटानाद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनावर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यातील मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडी केली आणि कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक वाढली, तेव्हा जर रुग्णांसाठी बेड्स उपलब्ध झाले नाही तर रुग्णांना कुठे ठेवायचे? असा प्रश्न विचारत राजेश टोपे यांनी भाजपला टोला लगावला आहे.

मंदिरे आणि प्रार्थनास्थळे खुली करण्यात येतील, पण योग्य वेळेत योग्य निर्णय घेण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. अंबड येथील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. तसेच मंदिरे उघडी करण्यासाठी जे आंदोलन आहे ते फक्त एक राजकारण आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टप्प्याटप्प्याने निर्णय घेत आहे, त्यामुळे त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहणे गरजेचे आहे, असेही राजेश टोपे म्हणाले आहे.