महाराष्ट्रराजकारण

भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात मोर्चा उघडला

कंगना राणौत प्रकरण आणि माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा मुद्दा यावरुन राज्यात भाजपा आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष पेटला आहे. यात भाजपाने आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात मोर्चा उघडला आहे.

भाजपा शिष्टमंडळाने महाराष्ट्रातील ठाकरे सरकारविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात मानवाधिकाराचं उल्लंघन होत असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वात राज्यसभा सदस्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. एचएल दत्तू यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत भाजपा खासदारांनी राज्यातील ८ घटनांचा हवाला देत ठाकरे सरकारवर गंभीर आरोप लावले आहेत.

राज्यसभेचे सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वात राज्यसभेचे खासदार भागवत कराड आणि डॉ. विकास महात्मे यांनी आयोगाला सांगितले की, डिसेंबर २०१९ पासून राज्यात मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात लिहिणाऱ्यांवर अत्याचार केले जात आहेत.

उद्धव ठाकरे सरकारमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचं भाजपच्या शिष्टमंडळानं म्हटलं आहे. अशा परिस्थितीत सर्व मानवी प्रकरणांची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दोषींवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी भाजपाकडून करण्यात आली आहे.