कृषीमहाराष्ट्र

लॉकडाऊनमुळे एका महिन्यातच व्यवसाय पडला बंद; पठ्याने शेतीकडे वळून कमवले लाखो रुपये..  

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एका तरुणाने शेती परवडत नाही म्हणून ती करण्याची ईच्छाच सोडून दिली होती. व्यवसाय करूनच पैसे मिळतात या हेतूने त्याने बारामतीमध्ये बेकरी प्रॉडक्टचे दुकान सुरू केले. हा तरुण इंदापूर तालुक्यातील सणसर गावचा. राहुल बाळासो निंबाळकर असे या तरुणाचे नाव.

त्याने दुकानात मोठी गुंतवणूक केली होती. मात्र व्यवसाय चालू केल्यानंतर काही दिवसातच भारतात कोरोनाने शिरकाव केला. आणि राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. यामुळे दुकान बंद करण्यात आले. दुकानातील बेकरीचे पदार्थ खराब झाले आणि त्यांचे मोठे नुकसान झाले. सगळी गुंतवणूक वाया गेली यामुळे त्यांनी पुन्हा शेती करण्याचा निर्णय घेतला.

यावर घरच्यांनी मोठा विरोध केला मात्र आता शेतीवरच काय असेल तर करू असा निर्णय त्याने घेतला. आणि सुरुवातीला शेतात टोमॅटोचे पीक घेतले. लॉकडाऊनमुळे त्यालाही उठाव नव्हता मात्र नंतर सरकारने लॉकडाऊनमध्ये हळूहळू शिथिलता आणली आणि टोमॅटोचे भाव वाढले. यामधून आता तो दिवसाआड 50 केरेटची विक्री करतो. लॉकडाऊन असल्यामुळे अनेक व्यापारी हे शेतात येऊन टोमॅटोची खरेदी करतात. यातून या तरुणाचा शेती करण्याचा आत्मविश्वास वाढला आहे आणि यातून तो लाखो रुपये कमवत आहे.

शेती परवडत नाही म्हणून अनेकांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. याच कारणामुळे शेतकरी मुलाला लग्नासाठी मुली देखील देण्यास लोक टाळाटाळ करतात. मात्र शेती देखील परवडते हे या तरुणाने दाखवून दिले आहे. या कामात त्याला त्याचे कुटुंबातील सदस्य मदत करतात. लॉकडाऊनमुळे मजुरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचे आई- वडील, चुलचे, व इतर सदस्य त्याला शेतीत मदत करतात. स्वता शेतात काम केल्यावर शेती नक्कीच परवडते असे राहुल नेहेमी सांगतो.