महाराष्ट्रराजकारण

सुशांत प्रकरणाचा सीबीआय तपास डॉ. दाभोलकर हत्या चौकशीप्रमाणे होऊ नये- शरद पवार

सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश काल दुपारी सर्वोच्च न्यायालयानं दिला. त्यानंतर पहिल्यांदाच शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयावर शरद पवारांनी ट्विट केलं. ‘मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी CBI मार्फत २०१४ मध्ये सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही,’ अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास CBI च्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे. काल सर्वोच्च न्यायालयानं याबद्दलचे आदेश दिले. या प्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम असल्याची राज्य सरकारची भूमिका होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे राज्य सरकारला धक्का बसला.