आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्र

सुशांत प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआय पथक मुंबईत दाखल

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे गेला आहे. तपास करण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. कालच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला. सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवून तपासात सहकार्य करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिल्या. त्यानंतर आता सीबीआयचे पथक सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत दाखल झाले आहे.

सीबीआय पथक सुशांतसिंह राजपूत प्रकरणाशी संबधित कागदपत्रे वांद्रे पोलिसांकडून ताब्यात घेण्याची शक्यता आहे. हे पथक घटनास्थळाची पाहणीही करण्याची शक्यता आहे. यावरून मोठे राजकारण देखील घडत आहे.

याप्रकरणी बिहार पोलिसांनी मुंबईत येऊन गोळा केलेले पुरावे सीबीआयने आधीच ताब्यात घेतले आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे पथक मुंबई पोलिसांकडून घटनास्थळाच्या पंचनाम्यापासून संभाव्य साक्षीदारांच्या जबाबांपर्यंत सर्व कागदपत्रे ताब्यात घेणार आहेत.

या तपासात सुशांतचे शवचिकित्सा अहवाल, न्यायवैद्यक प्रयोग शाळेने केलेला तपास, सीसीटीव्ही चित्रण, कॉल डेटा रेकॉर्डचाही समावेश असेल. यामध्ये आता राजकीय नेत्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे.