महाराष्ट्रराजकारण

मोदींचा वाढदिवस ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ म्हणून साजरा करा; विरोधकांचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस सध्या दोन दिवसांवर आला आहे. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७० वा वाढदिवस आहे. मोदींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. यावर्षी मोदींचा वाढदिवस हा ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी ‘सेवा सप्ताह’ची घोषणा केली.

वाढदिवसानिमित्त अन्नवाटपाबरोबरच मास्क, सॅनिटायझर आणि औषध वाटप करण्याची तयारी भाजपाने केली आहे. याचबरोबर रक्तदान शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार आहे. ७० ठीकाणी ७० कार्यक्रम करण्याचा भाजपाचा विचार आहे. मात्र एकीकडे भाजपाने सेवा सप्ताहची घोषणा केलेली असतानाच दुसरीकडे भाजपाच्या विरोधकांनी मोदींचा वाढदिवस हा राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.

बिहारमधील विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उत्तरेतील राजकारण चांगलेच तापले आहे. मागील वर्षी पंतप्रधान मोदींचा ६९ वा वाढदिवस पक्षाच्या माध्यमातून एक आठवडाभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करत साजरा करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर यंदा मोदींचा वाढदिवस ‘सेवा सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचा भाजपाचा मानस आहे. हीच गोष्ट लक्षात घेत बिहारमधील सुलेह देव समाज पार्टीचे प्रमुख पियुष मिश्रा यांनी ट्विटरवरुन हा आठवडा ‘बेरोजगारी सप्ताह’ म्हणून साजरा करावा असं आवाहन केलं आहे. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत लॉकडाऊन फसले आहे, अशी टीका विरोधक करत आहेत.