महाराष्ट्रलक्षवेधी

केंद्र सरकारकडून 240 ई-बस महाराष्ट्राला जाहीर

इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी मोदी सरकारने महाराष्ट्रातील एसटी महामंडळाला आणि नवी मुंबई महापालिकेला प्रत्येकी 100 इलेक्ट्रिक बस आणि मुंबईच्या ‘बेस्ट’ला 40 बस देण्याचे जाहीर केले आहे. फेम’ इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्याअंतर्गत देशात सर्वाधिक ई- बस महाराष्ट्राला मिळणार आहेत.

पहिल्या टप्प्यात पुण्यातील पीएमपीला केंद्र सरकारने 125 ई बस गेल्या वर्षी जाहीर केल्या आहेत. परंतु, त्यांची निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. पारंपरिक इंधनावरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारची कटीबद्धता आणि वाहनांमुळे होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाची दखल या निर्णयाद्वारे सरकारने घेतल्याचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीटरवर याबाबत माहिती देताना म्हटले आहे.

नरेंद्र मोदी यांच्या, पर्यावरण स्नेही वाहतुकीसाठीच्या दृष्टीकोनाला अनुसरून हा निर्णय घेतला असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. सार्वजनिक उपक्रम मंत्रालयाअंतर्गत अवजड उद्योग विभाग, भारतात इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहनांचा जलदगतीने स्वीकार आणि निर्मिती यासाठी (FAME India) योजना 2015 च्या एप्रिलपासून राबवत आहे. यामुळे प्रदूषण देखील कमी होणार आहे.