कृषीमहाराष्ट्र

शेतकरी अडचणीत असताना केंद्र सरकारकडून कांदा निर्यातबंदी- सदाभाऊ खोत

कांद्याबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सध्या राजकारण तापले आहे. कांदा जीवनाश्यक वस्तूंच्या यादीतून वगळल्यानंतर बाजारपेठेत हस्तक्षेप करणार नाही, हे केंद्र सरकारने दिलेले वचन खोटे आहे का?. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत असतांना निर्यातबंदी करण्याचा सरकारला अधिकार आहे काय? असा सवाल रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केला आहे. गेल्या सरकारमध्ये खोत हे भाजप सरकारमध्ये मंत्री होते आता त्यांनीच ही टीका केली त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नाशिकच्या कांद्याला बरे दर मिळू लागताच, गेले काही दिवस ओरड सुरु झाली होती. त्यात केंद्र सरकारने सोमवारी रात्री अचानक कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी व संबंधीत घटकांना कोट्यावधींचा फटका बसला आहे.

त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या गोटात सामील असलेले, शेतकरी नेते व माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचीही भाषा बदलली. त्यांनी यासंदर्भात केंद्र सरकारवरच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे. खोत म्हणाले, दिल्ली, मुंबईतील व्यापारी आणि केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लॉबीच्या चुकीच्या माहितीच्या आधारे कांदा निर्यातबंदी करण्यात आली. केंद्राने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा. अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.