महाराष्ट्रराजकारण

चंद्रकांत पाटील यांची पवारांवर टीका; ५० वर्षांपासून राजकारणात असताना मराठा आरक्षण का दिलं नाही?

सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी मोठ्या खंठपीठाकडे सोपवताना आरक्षणाच्या अमलबजावणीस तूर्तास स्थगिती दिली. त्यामुळे शैक्षणिक व नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या अंमलबजावणीचा मुद्दा पुढे आला आहे.

त्यावरून विरोधी पक्षांकडून सरकारवर टीका केली जात आहे. या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यादेश काढण्याचा सल्ला राज्य सरकारला दिला आहे. त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले,”शरद पवार यांच्याकडून ही अपेक्षा नाही. ते ५० वर्षांपासून राजकारणात असताना मराठा आरक्षण का दिलं नाही. सलग १५ वर्षात राज्यात तुमचं सरकार होतं. तुम्ही स्थापन केलेल्या बापट समितीने मराठा समाजाला मागास म्हटलं होतं. यावर मतदान झालं, पण त्यात फेटाळण्यात आलं.

१५ वर्षात मराठा आरक्षण दिलं नाही. लोकसभेत पराभूत झाल्यानंतर घाईघाईने विधानसभा निवडणुकीआधी राणे समितीच्या आधारावर आरक्षण दिलं. ते न्यायालयात टिकलं नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छा तुमची कधीच नव्हती. जर होती तर याआधी द्यायला हवं होतं. आता भाजपाने दिलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर तुम्ही अध्यादेश काढायला निघालात, हे म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसल्यासारखं आहे,” अशी टीका पाटील यांनी पवारांवर केली.