कोरोनादेश-विदेश

दिलासादायक – दिल्लीमध्ये २९ टक्के लोकांमध्ये निर्माण झाल्या करोनाविरोधात अँटीबॉडीज

Newsliveमराठी – दिल्लीकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. कोविड-१९ विरोधात दिल्लीत २९ टक्क्यापेक्षा जास्त लोकांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात दिल्लीत करण्यात आलेल्या दुसऱ्या सिरो सर्वेमधून ही बाब समोर आली आहे.

एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान दिल्लीत करण्यात आलेल्या दुसऱ्या सिरो सर्वेचे निष्कर्ष गुरुवारी जाहीर करण्यात आले. करोनामुळे दिल्लीत नेमकी काय स्थिती आहे, ते समजून घेण्यासाठी हा सिरो सर्वे करण्यात आला. दिल्लीतील २९.१ टक्के जनतेच्या शरीरात करोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या शरीरात जास्त अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. ३२.२ महिला तर २८.३ टक्के पुरुषांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या.

दिल्लीमध्ये २७ जून ते १० जुलै दरम्यान पहिला सिरो सर्वे करण्यात आला होता. त्यात २४ टक्के लोकांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्याचे दिसून आले होते. अँटीबॉडीज तयार होणे याचाच अर्थ करोना व्हायरसची बाधा होऊन त्यातून बरे होणे. अँटी बॉडीज म्हणजे शरीरात करोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होणे. पहिल्या सिरो सर्वेनंतर दिल्ली हर्ड इम्युनिटीच्या दिशेने जात असल्याचे संकेत आहेत असे तज्ज्ञांनी सांगितले होते.