कोरोनालक्षवेधी

राम जन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख करोना पॉझिटिव्ह

Newsliveमराठी – अयोध्येतील राम जन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्यगोपाल दास यांना करोनाची लागण झाली आहे. चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या आठवड्यात अयोध्येत पार पडलेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला महंत नृत्यगोपाल दास हजर होते. यावेळी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या संपर्कात आले होते. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महंत नृत्यगोपाल दास यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे.

५ ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. करोनाच्या पार्श्वभूमीवर ठराविक लोकांनाच कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. मंचावरही फक्त पाच लोकांनाच परवानगी होती. यामध्ये महंत नृत्यगोपाल दास यांचा समावेश होता. यावेळी त्यांच्यासोबत मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील हजर होते. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यावेळी अनेकदा महंत नृत्यगोपाल दास यांच्याजवळ गेले होते.