कोरोनामहाराष्ट्र

पुण्यात कोरोना परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल- राजेश टोपे

कोरोनाचा पुण्यातील वेग दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्यात निर्माण झालेली परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल, असे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राजेश टोपे यांनी सांगितले की, सध्याच्या घडीला पुण्यात कोरोना रुग्णांसाठी बेडची अडचण नाही. परंतु, आम्ही ऑक्सिजन आणि आयसीयू बेडस वाढवण्यावर भर देत असल्याचे टोपे यांनी सांगितले.

खासगी रुग्णालयांकडून लोकांना लुबाडले जाणार नाही, याचीही काळजी घेत असल्याचे टोपे यांनी म्हटले. कोरोनाच्याबाबतीत महाराष्ट्राने देशात दिशादर्शक काम केले आहे. खासगी रुग्णालयांमध्ये ८० टक्के बेडस् मिळावेत, यासाठी दोन अधिकारी देखील नेमले आहेत.

रुग्णांकडून जास्त पैसे आकारले जाणार नाही, यासाठी ऑडिटरची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना सातत्याने या सगळ्याची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही, यावर नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यात आता अनलॉकची प्रकिया सुरु आहे. पुण्यात दरवर्षी गणपती उत्सव सर्व आनंदउत्सवाने साजरा केला जातो. पण यावेळी कोरोनामुळे गणेशोत्सव पुण्यात साध्या पद्धतीने शासन नियमाप्रमाणे साजरा केला जावा, असे आवाहन यावेळी राजेश टोपे यांनी केले. ते आज पुणे दौऱ्यावर होते.