बातमीमहाराष्ट्र

वडगांवमध्ये कटेंनमेंट झोन असतांना रेशनिंग दुकानासमोर नागरिकांची गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

Newslive मराठी-  अहमदनगर | पाथर्डी तालुक्यातील वडगांव ग्रामपंचायत कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत केलेलं आहे. मात्र असं असतांना सुद्धा रेशन धान्य दुकानासमोर नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे वडगांवमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या संख्येमुळे तहसील प्रशासनाने गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषीत केले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थपने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

रेशन धान्य दुकान अत्यावश्यक सेवेत येत असल्यामुळे गावामध्ये धान्य वाटप करण्यात आले. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने स्थानिक पातळीवर कसलेच नियोजन न केल्यामुळे रेशन धान्य दुकानांसमोर नागरिकांची गर्दी झाली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला.

गावातील तरूणांनी याबाबत ग्रामपंचायत प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत उडवाउडवी उत्तरे देऊन जबाबदारी झटकली. ग्रामपंचायतीच्या अश्या ढिसाळ कारभारामुळे पुढील काळात गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली तर त्याला ग्रामपंचायत प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहिल असा आरोप गावातील तरूणांनी केला आहे.