महाराष्ट्र राजकारण

१९ ऑक्टोबरपासून देवेंद्र फडणवीस अतिवृष्टी भागांचा दौरा करणार

राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने रातोरात नुकसान झाले आहे. बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दि. १९ ऑक्टोबरपासून ३ दिवसांचा दौरा करणार आहेत.

सध्या बिहारमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस हे बिहारच्या दौऱ्यावर आहेत. मात्र या निवडणूक प्रचाराच्या धावपळीतही ते वेळ काढून दौरा करणार आहेत. देवेंद्र फडणवीस १९ ऑक्टोबरला बारामतीपासून आपला दौरा प्रारंभ करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना होतील.

पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसर्‍या दिवशी दि. २० रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तिसर्‍या दिवशी दि. २१ रोजी हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील. या तीन दिवसांत ९ जिल्ह्यांमध्ये सुमारे ८५० कि.मी.चा प्रवास ते करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *