महाराष्ट्रराजकारण

भाभीजी के पापड खाऊन लोक बरे झाले का?- संजय राऊत

देशातील करोनाचा प्रसार अजूनही थांबलेला नाही. दिवसेंदिवस स्थिती गंभीर होत असून, दिवसाला एक लाखांच्या जवळपास रुग्ण आढळून येत आहेत. देशातील करोना परिस्थितीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी संसदेत सविस्तर निवेदन केलं. महाराष्ट्रात अनेक लोक कोरोनातून बरे झालेत. धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आहे. धारावातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने बीएमसीचे कौतुक केले.

पण तरीही कोरोनावरुन महाराष्ट्रावर टिका केली जात असल्याचे सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खंत व्यक्त केली. ते राज्यसभेत बोलत होते. मला सदस्यांना विचारायचे आहे की इतके लोक कसे बरे झाले? हे लोक भाभाजीचे पापड खाऊन बरे झाले आहेत का? असा सवाल करत राऊत यांनी ही राजकीय लढाई नसून लोकांचे प्राण वाचवण्याची लढाई आहे, अशा शब्दांत घणाघात केला.

देशाची आर्थिक परिस्थिती खूप गंभीर आहे. अशा स्थितीत जीडीपी आणि आरबीआय कंगाल झाले आहेत. अशात सरकारने एअर इंडिया, रेल्वे, LIC आणि बरेच काही बाजारात विकण्यासाठी आणले आहे. खूप मोठा सेल लागला आहे. या सेलमध्ये जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टला देखील आणून उभे केले आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.

कोविड विरोधात राज्य सरकार व्यवस्थित काम करत आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वात कोरोनाविरोधातील लढाई लढत आहे. केंद्राकडून महाराष्ट्राला मिळणारी मदत का बंद झाली? असा सवाल राऊत यांनी केला. जीएसटीचा राज्याला वाटा तरी द्या, अशी मागणी त्यांनी राज्यसभेत केली.