महाराष्ट्रराजकारण

मन की बात मध्ये परिक्षांऐवजी खेळण्यांवर चर्चा- राहुल गांधी

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’द्वारे संपूर्ण देशाशी संवाद साधतना, खेळणी उद्योगावर भाष्य केले. भारताला खेळणी उद्योगातील प्रमुख ठिकाण बनवण्यासाठी सर्वांनी एकत्र येत प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच, आता सर्वांसाठी लोक खेळण्यांसाठी व्होकल होण्याची वेळ आली असल्याचेही सांगितले.

यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर ट्विट करत निशाणा साधला आहे. “पंतप्रधानांनी ‘परिक्षेवर चर्चा करावी असं ‘जेईई-नीट’ च्या परीक्षार्थींना वाटत होतं मात्र, पंतप्रधानांनी केली ‘खेळण्यांवर चर्चा’ अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधला.

देशासह राज्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, अशा परिस्थितीत परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका उद्भवू शकतो, अशी भूमिका घेत विरोधी पक्षांची सरकारं असलेल्या राज्य सरकारांनी नीट व जेईई परीक्षा घेण्यास विरोध केलेला आहे. परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी या राज्यांनी केली आहे. तसेच, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका देखील दाखल करण्यात आलेली आहे.