इंदापूरबातमीमहाराष्ट्र

बारामती, भिगवणच्या डॉक्टरांनी नाकारलं; रुग्णाचा मृत्यू

Newslive मराठी- भिगवण : सध्या सर्वत्र कोरोनाचा हाहाकार आहे. त्यामुळे सर्व लोकांमध्ये कोरोनाची दहशत आहे. त्यातच एखादा सामान्य आजार झाला तरी लोक घाबरत आहेत. शिवाय, असे साधे आजार असणाऱ्या रूग्णांनाही डॉक्टर सेवा देण्यास टाळाटाळ करत आहेत. अशीच घटना आज (22 एप्रिल) पहाटे इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे घडली.

तक्रारवाडीतील विष्णू नामदेव काळंगे (52 वर्ष) यांना छातीत आणि पोटात दुखत असल्यामुळे जीव गमवावा लागला. धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टरांनी त्यांना दाखल करून न घेतल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार असे, की विष्णू काळंगेंना 15 दिवसापूर्वी निमोनिया आजाराचा त्रास होत होता.

यावेळी भिगवण येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी त्यांना नेले असता खासगी दवाखान्यातून भिगवण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. यावेळी भिगवण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून त्यांना पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे त्यांच्या निमोनिया आजारावर उपचार करण्यात आला. तसेच त्यांची कोरोनाची तपासणी करण्यात आली. यावेळी तपासणीत त्यांचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला.

पुढील उपचारादरम्यान त्यांची प्रकृती ठीक झाल्याने त्यांना 8 दिवसापूर्वी डिस्चार्ज देण्यात आला होता. या 8 दिवसात त्यांना कोणतीही आरोग्याची समस्या जाणवली नाही. काल (21 एप्रिल) रात्री जेवण झाल्यानंतर 11च्या सुमारास पुन्हा त्यांच्या पोटात आणि छातीत दुखू लागल्याने त्यांना नातेवाईकांनी भिगवणच्या खासगी आय.सी.यु सेंटरमध्ये उपचारासाठी नेले. संबंधित डॉक्टरांनी यापूर्वी त्यांच्यावर उपचार केले होते.

यावेळी या खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांना काळंगेंची पाठीमागील हिस्ट्री माहित असताना आणि त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती असतानाही त्यांना वैदकीय सेवा दिली नाही. पुढील उपचारासाठी पुन्हा पुणे येथे जाण्याचा सल्ला दिला.

मात्र त्यांची प्रकृती अधिकच बिघडू लागल्याने नातेवाईकांनी त्यांना बारामतीच्या नामांकित खासगी हॉस्पिटल तसेच बारामती हॉस्पिटल येथे नेले. मात्र येथेही त्यांना आवश्यक वैदकीय सेवा पुरविण्यात आली नाही. यानंतर त्यांना बारामतीच्या शासकीय सिल्व्हर ज्युबली हॉस्पिटमध्ये नेले. मात्र तोपर्यंत काळंगेंचा मृत्यू झाला.

दरम्यान, कोरोनाच्या भीतीमुळेच आमच्या रुग्णाला सेवा नाकारली असल्याचे काळंगेंच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. शवविच्छेदन अहवाल मिळाल्यावर याबाबत योग्य ती कायदेशीर प्रक्रिया केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जर स्थानिक डॉक्टरांनी यावेळी तत्काळ सेवा दिली असती तर आमच्या रुग्णांचा जीव वाचला असता, असेही नातेवाईकांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या-

बारामतीत पहिल्यांदाच आपीएलच्या पार्श्वभूमीवर बीपीएलचे आयोजन

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi