कोरोनामहाराष्ट्र

गरजू रुग्णांचे आयसीयू बेड विनाकारण अडवून ठेवू नका- उद्धव ठाकरे

सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. यातच आता आयसीयू बेडची मोठी कमतरता भासू लागली आहे. कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वच रुग्णांना ऑक्सिजन आणि आयसीयूची गरज नसते. मात्र, अनेकजण ओळखी पाळखीचा उपयोग करून गरज नसतानाही आयसीयू बेड अडकवून ठेवतात. हे बेड गरजू रुग्णांसाठी आहेत, ते विनाकारण अडवून ठेवू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केली आहे.

नवी मुंबई महापालिका प्रशासनाने उभारलेल्या कोविड सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन उपस्थितीमध्ये शुक्रवारी पार पडले. ऑक्सिजन बेडसाठी कोरोना रुग्णांची होत असलेली परवड थांबवण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने तुर्भे येथील राधास्वामी सत्संग आश्रमात आणि सानपाडा येथील एमजीएम रुग्णालयामध्ये 1003 ऑक्सिजन बेडची अतिरिक्त व्यवस्था केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

अत्याधुनिक कोविड सेंटर अन्य सहा सुविधांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. यावेळी ते म्हणाले की कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रत्येकाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या भावनेतून काम करणे आवश्यक आहे. आपल्यामुळे आपले कुटुंब अडचणीत येणार नाही, याची दक्षता प्रत्येकाने घेण्याची गरज आहे. पुढील तीन महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत. गरज असेल तरच घराबाहेर पडा.