कोरोनामहाराष्ट्र

मला अॅक्‍शन घ्यायला भाग पाडू नका- अजित पवार

सध्या देशात सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात आढळत आहेत. पुणेकरांना हादरवून टाकण्याइतपत कोरोना वाढतोय, हे का आणि कसे घडतेय? एवढे करूनही “रिझल्ट’ कुठेच कसा दिसत नाही? मग, तुम्ही सगळीजणं काय करताय? अशा प्रश्‍नांचा मारा करीत, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर शुक्रवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मला मोठी ऍक्‍शन घ्यायला भाग पाडू नका, असा दमही पवार यांनी भरला. म्हणजे, कोरोना आटोक्‍यात न आल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांची गय नसेल, हेच पवार यांनी अधोरेखित केले. दुसरीकडे, कोरोनाला रोखण्याचे नेमके उपाय आणि त्याचा “रिझल्ट’ दाखविण्याऐवजी अधिकारी मात्र नेहमीप्रमाणे आकड्यांचा समावेश असलेले सादरीकरण करत आहेत.

पुण्यात कोरोनाची साथ झपाट्याने पसरत असल्याचे आकडे पुढे येऊ लागले आहेत. सध्याच्या रोजच्या तपासणीतून 30 टक्‍क्‍यांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा होत असल्याने महापालिका प्रशासन हदरले आहे. तर परिस्थितीत सुधारणा न झाल्यास पुणेकरांपुढे मोठे संकट उभे राहण्याची भीतीही महापालिकेला आहे. यामुळे अजित पवार रोज अनेक बैठका घेत आहेत. मात्र परिस्थिती आहे तशीच आहे. भविष्यात पुण्यात अजून धोका वाढू शकतो.