महाराष्ट्रराजकारण

ड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा- प्रवीण दरेकर

सध्या बॉलीवूडमध्ये ड्रग्ज कनेक्शन उघड होत असून अनेक नावे समोर येत आहेत.अभिनेत्री कंगना राणावत हिने आपण ड्रग्ज घेतो असे सांगितले असेल तर तिचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज केली. कंगनाला एनसीबीने चौकशीसाठी बोलावले तर कोणाच्याही पोटात दुखण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले आहेत. दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना ही मागणी केली. आपण ड्रग्ज घेत होतो असे कंगनाने एका व्हिडीओत सांगितले आहे याकडे पत्रकारांनी प्रवीण दरेकर यांचे लक्ष वेधले.

ते म्हणाले चित्रपटसृष्टी वैभवशाली आहे आणि नवोदित कलाकार अंमली पदार्थांच्या आहारी जात असतील तर ते हिताचे नाही. अंमली पदार्थांचे सेवन केवळ कलाकार नव्हे तर कोणाच्याही हिताचे नाही. मात्र कंगनाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीतील अंमली पदार्थांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अंमली पदार्थांचा विळखा चित्रपटसृष्टीला पडायला नको. यामध्ये कोणालीही पाठीशी घालायला नको. प्रत्येक गोष्टीत राजकारण करायची गरज नाही असेही दरेकर यांनी स्पष्ट केले. यावरून आता राजकारण पेटले आहे.