महाराष्ट्रराजकारण

आता राज्यभरात धनगर आरक्षणासाठी ढोल घुमणार

मराठा आरक्षणाच्या पाठोपाठ राज्यात आता धनगर आरक्षणाचा मुद्दा ही पेटू लागला आहे. धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करावा, या प्रमुख मागणीसाठी धनगर समाज रस्त्यावर उतरताना दिसू लागला आहे. आज राज्यभरातून धनगर समाज ‘ढोल बजाओ’ आंदोलन करणार आहे. आंदोलनाची जय्यत तयारी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरासमोरील महाद्वार घाटावर पूर्ण झाली आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनासाठी चंद्रभागेवरील महाद्वार घाट बॅनरने भरुन गेला आहे. महाद्वार घाटावर हे आजवरचे पहिलेच आंदोलन होत असून या पायऱ्यांवर सोशल डिस्टन्स पाळत आंदोलकांना उभारण्यासाठी गोल आखण्यात आले आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली ढोल बजाओ आंदोलनाला सुरुवात होणार आहे.

आदिवासींना दिले जाणारे आरक्षणाचे सर्व लाभ धनगरांनाही मिळावेत, या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने शुक्रवारी राज्यभर ढोल बजाओ आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली .