महाराष्ट्रराजकारण

खडसेंसारख्या कार्यकर्त्यांच्या योगदानामुळेच पक्षाला आज ‘अच्छे दिन’- नितीन गडकरी

फार पूर्वीपासून जेव्हा राज्यात पक्षाच काहीही अस्तित्व नव्हतं तेव्हापासून खडसेंसोबत राज्यात पक्षाचे काम करीत आलो आहे. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या बरोबर त्यावेळच्या प्रतिकूल स्थितीत आम्ही राज्यात पक्षाची उभारणी केली. पक्षाला आज जे चांगले दिवस आलेत, ते खडसेंसारख्या कार्यकर्त्यांच्या योगदानामुळे आले आहेत, असे गौरवोदगार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले आहे.

‘जनसेवेचा मानबिंदू : एकनाथराव खडसे’ या पुस्तकाचे प्रकाशन आज गडकरींनी नागपूर मधून ऑनलाइन पद्धतीने सहभागी होत केले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी चंद्रपूरमधून माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, भोकरदनहून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे औरंगाबादहून सहभागी झाले होते.

हा प्रकाशनाचा प्रत्यक्ष कार्यक्रम मुक्ताईनगरात खडसेंच्या फार्म हाऊस परिसरात झाला. यावेळी गडकरी बोलत होते गडकरी म्हणाले, खडसेंना त्यांच्या जीवनात अनेक संघर्ष, संकटांना तोंड द्यावे लागले. व्यक्तिगत स्तरावर अनेक संकटांवर त्यांनी सक्षमपणे मात केली. त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचे पक्षाच्या उभारणीत योगदान आहे. नाथाभाऊ माझ्यापेक्षा मोठे आहेत, मात्र ते शतायुषी व्हावेत, असे गडकरी म्हणाले. यावेळी खडसे यांनी पक्षात झालेल्या अन्यायाबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली.