कोरोनादेश-विदेशराजकारण

करोनाच्या काळातील निवडणूक आयोगाची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

Newsliveमराठी – करोनाच्या कालावधीत होणाऱ्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने काल व्यापक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे (ईव्हीएम) बटण दाबण्यासाठी मतदारांना हातमोजे उपलब्ध करून देण्यात येणार असून अलगीकरणात असलेल्या रुग्णांना मतदानाच्या दिवशी अखेरच्या एका तासात मतदान करण्याची मुभा देण्यात येणार आहे. वापर केल्यानंतर विल्हेवाट लावता येतील असे हातमोजे देण्यात येण्याची शक्यता आहे.

जो परिसर संक्रमित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे तेथील मतदारांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जाणार आहेत. मतदान केंद्रांचे मतदानाच्या आधीच्या दिवशी र्निजतुकीकरण करणे बंधनकारक करण्याची शिफारसही निवडणूक आयोगाने केली आहे.

प्रत्येक मतदान केंद्राच्या प्रवेश द्वारावर थर्मल चाचणी यंत्र बसविण्यात येणार असून निवडणूक अथवा निमवैद्यकीय कर्मचारी मतदारांची थर्मल चाचणी करणार आहेत. मतदान केंद्रात १५०० ऐवजी जास्तीत जास्त एक हजार मतदारांना प्रवेश देण्यात येणार आहे.उमेदवारासह पाच जणांच्या एका गटाला घरोघरी प्रचारात सहभागी होण्याची मुभा देण्यात आली आहे, मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रचारात सहभागी होण्याची मनाई करण्यात आली आहे. रोड-शोमध्ये पाच वाहनांच्या ताफ्यानंतर अंतर ठेवावे लागणार आहे. त्याचप्रमाणे जाहीर सभा, मेळावे कोविड-१९च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून आयोजित करता येऊ शकतात, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याने जाहीर सभांसाठीची मैदाने वेळेपूर्वीच निश्चित करावयाची असून तेथे प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग निश्चित करणे गरजेचे आहे. या मैदानांमध्ये सामाजित अंतर राखण्यासाठी खुणा करणे आवश्यक आहे. राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने जाहीर सभेसाठी किती जणांच्या उपस्थितीला मान्य दिली आहे त्याप्रमाणे लोक उपस्थित राहतील याची खबरदारी जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घ्यावयाची आहे, असे आयोगाने म्हटले आहे.करोनाच्या काळात विधानसभेची निवडणूक होणारे बिहार हे पहिले राज्य आहे. तेथे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे.