महाराष्ट्रराजकारण

पंतप्रधान मोदींच्या हत्येची धमकी देणारा ईमेल, सुरक्षा यंत्रणा अलर्ट

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एक धक्कादायक मेल आला आहे. नरेंद्र मोदी यांच्या हत्येबाबत राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांना ईमेल आला आहे. ज्यात पंतप्रधान मोदी यांची हत्या करण्याची धमकी दिली आहे. या ईमेलनंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये केवळ तीन शब्दांचा वापर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार NIA ला मिळालेल्या या ईमेलमध्ये केवळ Kill Narendra Modi या ३ शब्दांचा वापर करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. मिडिया रिपोर्टनुसार राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाला माहिती दिली आहे. ज्यानंतर गृहमंत्रालयाने तात्काळ SPG ला अलर्ट केले आहे.

एसपीजीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. सध्या NIA कडून ईमेलमधील कन्टेंन्टची तपासणी सुरु आहे. याबाबत गृहमंत्रालयाला पत्र लिहून माहिती देण्यात आली आहे. या पत्रात एनआयएला एक ईमेल प्राप्त झाला असून त्यात काही लोकांच्या हत्येची धमकी देण्यात आली आहे. यातील मजकूर आणि ईमेल कॉपी गृहमंत्रालयाला पाठवलेल्या पत्रासोबत जोडली आहे. यामुळे आता सुरक्षा यंत्रणा सावध केली आहे.