बातमीमहाराष्ट्र

हल्ली पहारेकरीही चोऱ्या करायला लागलेत- उद्धव ठाकरे

Newslive मराठी: आता शेतकरी-कष्टकऱ्यांचं तुफान उठलंय. त्याला शांत करणार नसाल तर तुमच्या मांडीला मांडी लावून बसण्यात काय अर्थ. राम मंदिर झालंच पाहिजे. राफेलमध्ये घोटाळा झालाय. किती पापं करणार? हल्ली पहारेकरीही चोऱ्या करायला लागलेत, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली. पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरावर आयोजित सभेत ते बोलत होते.

माझ्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, ज्यांनी माझ्या जनतेचं वाकडं केलंय, त्याला अद्दल घडव हेच विठ्ठलाच्या चरणी माझं साकडं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘आज पंढरपुरात आलोय. उद्या वाराणासीतही जाईन. कुंभकर्णाला जागं करण्यासाठी संपूर्ण देश फिरेन. कुंभकर्ण झोपलेला असला तरी हिंदू झोपलेला नाही. त्यामुळे कुंभकर्णा आता जागा हो, नाही तर पेटलेला हिंदू तुला जागं केल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा देतानाच कुंभकर्णाला जागं करण्यासाठीच अयोध्येला गेलो होतो, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

‘शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आवाज उठवणं गुन्हा असेल तर तो गुन्हा करणारच. न्याय मागणं आणि सरकारला धारेवर धरणं गुन्हा असेल तर हा गुन्हा करणारचं. हिंमत असेल तर मला शिक्षा करून दाखवा,’ असं आव्हान देतानाच तुमची मस्ती इथे नाही चालणार. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, शिवरायांचा महाराष्ट्र तुमची मस्ती खपवून घेणार नाही, असा घणाघातही त्यांनी केला.