महाराष्ट्रराजकारण

कोरोनाशी लढताना सर्वांना अधिक शक्ती मिळो- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

श्री गणेशाची प्रतिष्ठापना आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही करत आहोत. मात्र, यावेळेस आपल्यासमोर कोरोनाचे विघ्न आहे. या विघ्नातून लवकरात मुक्ती मिळावी तसेच या साथीचा मुकाबला करण्यासाठी कोविड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना अधिक शक्ती मिळावी, अशी प्रार्थना केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

त्यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सण आणि उत्सवांची बदललेली रूपे आपण पाहिली आहेत. त्यात काळानुरूप बदल आपण स्वीकारले आहेत. सामाजिक जागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली.

कोरोनामुळे जिथे सगळे जग हादरून गेले, तिथे याविरुद्ध एक मोठा लढा लढण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. यातून एक नवे समाज प्रबोधन आपण करू आणि सामाजिक भान ठेवत शांततेत आणि साधेपणाने यंदाचा गणेशोत्सव आपण साजरा करू, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

संपूर्ण उत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. तसेच गाफील न राहाता आतापर्यंत आपण जी काळजी घेत आहोत, तशीच यापुढेही घ्यावी असेही ते म्हणाले.