कोरोनामहाराष्ट्र

सोलापुरात पुन्हा जलद चाचण्या सुरू

Newsliveमराठी – सोलापुरात गेल्या महिन्यात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी पुन्हा दहा दिवसांची टाळेबंदी लादण्यात आली असतानाही त्या काळात करोनाची साखळी तोडण्यासाठी पुरेशा प्रमाणात जलद चाचण्या घेण्यात आल्या नव्हत्या. दुसरीकडे जिल्हा ग्रामीणमध्ये करोनाबाधित रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींसह ‘कोमॉर्बिड’ व्यक्तींसाठी जलद चाचण्यांचा वापर मोठय़ा प्रमाणात होत आहे. शहरातही आता पुन्हा मागणीनुसार जलद चाचण्यांची मोहीम राबविण्यात येत आहे.

शुक्रवारी शहरात २२१६ चाचण्या घेण्यात आल्या असता त्यात ४५ बाधित रूग्ण सापडले. तर दोन रूग्ण दगावले. जिल्हा ग्रामीणमध्ये २६२८ चाचण्या घेण्यात आल्या असता २८८ बाधित रूग्ण आढळून आले. तर तीन रूग्णांचा मृत्यू झाला. शहर व जिल्ह्यात मिळून एकाच दिवशी ३३३ बाधित रूग्ण सापडले. तर पाच रूग्णांचा मृत्यू झाला.

त्यामुळे एकूण रूग्णसंख्या १२ हजार ७४९ इतकी झाली असून याशिवाय मृतांचा आकडा ५८४ वर गेला आहे. यात शहरातील रूग्णसंख्या ५६८९ असून मृत्यू ३८७ आहेत. जिल्हा ग्रामीणमधील रूग्णसंख्या ७०६० एवढी आहे. तर मृतांची संख्या १९७ झाली आहे.

शहर व जिल्ह्यात मिळून आतापर्यंत एक लाख १३८४ संशयित रूग्णांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले असता त्यात बाधित रूग्णांचे प्रमाण १२.५७ टक्के इतके आहे. तथापि, शहरात आतापर्यंत ७७.४४ टक्के रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.

तर मृत्यूचे प्रमाण मात्र अजूनही ६.८० टक्के आहे. चाचण्यांमधून बाधित रूग्ण सापडण्याचे प्रमाण १३ टक्के आहे. जिल्हा ग्रामीणमध्ये करोनामुक्त होण्याचे प्रमाण शहरापेक्षा कमी, म्हणजे ५७.९८ टक्के इतके राहिले आहे. मात्र मृत्यूचे प्रमाण २.७९ टक्कय़ांवर मर्यादित राहिले आहे. एकूण चाचण्यांतून बाधित रूग्ण आढळून येण्याची टक्केवारी १२.२५ एवढी आहे.