कृषीमहाराष्ट्र

शेतकऱ्याने घरीच बनविले खत पेरणी यंंत्र! अनेकांनी केली मागणी

अकोट येथील खारपाणपट्ट्यातील एका शेतकऱ्याने पिकांच्या वाढीकरिता घरीच खत पेरणी यंत्र तयार केले आहे. हरिभाऊ वाघोडे यांच्याकडे २५ एकर वडिलोपार्जित शेती आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने शेती व्यवसायाला वाहून घेतले आहे. खारपाणपट्ट्यात शेती निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पाऊस न आल्यास हंगामातीत पीक हाताखालचे जाऊन आर्थिक फटका सहन करावा लागतो.

दुसरीकडे पिकांना खत देण्यासाठी मजुरीचा खर्च येतो परंतु शेतामध्ये मजूर खत फेकतात. त्यामुळे खत पिकाच्या मुळाशी पोहोचत नाही. पर्यायाने बाष्पीभवन होते तर पाऊस झाल्यास खत वाहून जाते, अशा मन:स्थितीत लॉकडाऊनमध्ये एक दिवस हरिभाऊ वाघोडे हे घरी बसलेले असताना त्यांना घरात तेलाची निकामी कॅन दिसली.

त्यांनी घरीच वखराला लावण्यासाठी १५ लीटर तेलाची निकामी कॅनची खतपेटी केली. त्याला दोन होल करून वखराला फिटिंग केली. वखराला पेरणी यंत्राचे दाते लावले. केवळ अडीच हजारांचे साहित्य व वेल्डिंग मजुरीचा त्यांना खर्च आला. वाघोडे यांनी खत पेरणी यंत्राचा प्रत्यक्ष शेतीवर प्रयोग केला असता तो यशस्वी ठरला.

सध्या या खत पेरणी यंत्राची उपयोगिता पाहून अनेक शेतकऱ्यांनीसुद्धा हा यशस्वी प्रयोग करणे सुरू केले आहे. त्यामुळे खत पेरणी यंत्राचा हा जुगाड टेक्नॉलॉजीचा प्रयोग शेतीकरिता फायदेशीर ठरत आहे.