बातमीशैक्षणिक

अंतिम वर्षांच्या परीक्षा होणारच- युजीसी

Newslive मराठी- उच्च शिक्षण संस्था आणि महाविद्यालयांच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी होत असल्याने परीक्षांना स्थगिती मिळेल वा त्या पुढे ढकलल्या जातील असे गृहित धरू नये, अशी भूमिका विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात मांडली. याप्रकरणी पुढील सुनावणी 10 ऑगस्टला आहे.

देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने आपले म्हणणे मांडावे, असे निर्देश न्यायालयाने दिले. सोमवारी, 3 ऑगस्टपर्यंत हे निवेदन न्यायालयाला सादर केले जाईल, असे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी स्पष्ट केले. परीक्षांना स्थगिती देण्याबाबत हंगामी आदेश देण्याची विनंती न्या. अशोक भूषण, न्या. आर. सुभाष रेड्डी आणि न्या. एम. आर. शहा यांच्या पीठाने फेटाळली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राज्य आपत्ती नियंत्रण समिती बनवण्यात आली असून महाविद्यालयांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राज्य सरकारलाही म्हणणे मांडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

अंतिम वर्षांच्या परीक्षा 30 सप्टेंबपर्यंत पूर्ण करण्याचा आदेशयूजीसीने 6 जुलै रोजी काढला होता. त्याला 13 राज्यांतील विद्यार्थ्यांनी आव्हान दिले आहे. विधि शाखेचा विद्यार्थी यश दुबे आणि युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही याचिका दाखल केली असून त्यावरील म्हणणे न्यायालयाने ऐकले. आयोगाने विद्यार्थ्यांची शारीरिक आणि मानसिक स्थिती तसेच, त्यांच्या सुरक्षिततेचा विचार केला नसल्याचे युवा सेनेच्या याचिकेत नमूद केले आहे. या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मराठा तरुणांना आर्थिक दुर्बल 10 टक्के आरक्षण नाही; सरकारी जीआरवर विनोद पाटील आक्रमक