कोरोनामहाराष्ट्र

अखेर महाबळेश्वर-पाचगणीत हॉटेल सुरू करण्यास परवानगी

कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून हॉटेल्स बंद आहेत. याचा मोठा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे.आता नियम व अटींवर महाबळेश्वर पाचगणी येथील हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्याचे वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले यांनी संगितले.

या दोन्हीही पर्यटनस्थळांवरील हॉटेल व्यावसायिकांची नुकतीच प्रांताधिकारी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस तहसीलदार सुषमा चौधरी- पाटील, महाबळेश्वर पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील, पाचगणी पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्यासह महाबळेश्वर व पाचगणी येथील हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते. बैठकीत पुढील काही अटींवर हा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे.

पर्यटकांचे ‘ऑनलाइन’ आरक्षण करावे, आलेल्या पर्यटकांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र घ्यावे, आलेल्या सर्व पर्यटकांची माहिती प्रशासनास कळवावी, हॉटेलमधील नोकरांची कोरोना चाचणी करावी, पर्यटकांना खोली देण्यापूर्वी व पर्यटक गेल्यानंतर खोलीमध्ये औषध फवारणी करावी, तसेच हॉटेल व परिसरात दोन वेळा जंतुनाशक फवारणी करावी, ताप आणि शरीरातील प्राणवायूची पातळी मोजल्यावरच पर्यटकांना प्रवेश द्यावा, पर्यटक, हॉटेल कर्मचाऱ्यांनी मास्क व हातमोजे यांचा वापर करावा, हॉटेल परिसरातील स्वीमिंग पूल व बार बंद ठेवावेत, हॉटेलमधील सर्वांनी शारीरिक अंतर राखावे आदी नियम आणि अटी प्रशासनाकडून या व्यावसायिकांना घालण्यात आल्या आहेत. यामुळे आता येथील हॉटेल चालू करण्यात आले आहेत.